सावरकर एक विचारधारा भाग 9

    मागील भागात आपण पाहिले की, विनायक सावरकर व त्यांचे बंधू गणेश सावरकर यांना जनतेच्या आंदोलनामुळे व सरकारवरील वाढत्या दबावामुळे अंदमानातून भारतात परत आणण्यात आले. परंतु ब्रिटिश सरकारला विनायक सावरकरांची धास्ती असल्यामुळे त्यांना रत्नागिरी मध्ये स्थानबद्धतेमधेच ठेवण्यात आले. म्हणजे त्यांना रत्नागिरी जिल्हा सोडून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. तसेच  त्यांना किमान पुढील पाच वर्षे राजकारणात भाग घेण्यासही  बंदी घालण्यात आली.                   

            त्यामुळे सतत कार्यरत राहण्याची सवय असणाऱ्या या माणसापुढे आता प्रश्न होता की, राजकारण नाही तर आता करायचे तरी काय ? आणि याचे उत्तर त्यांनी शोधले ते म्हणजे आता संपुर्ण वेळ द्यायचा तो समाजकारण आणि समाजसुधारणांमध्ये. 

           सावरकरांना उघडपणे राजकारणात सहभाग घेण्यास बंदी होती.  पण खरेतर ते राजकारणापासून कधीच अलिप्त राहिले नाहीत. उघडपणे परवानगी नाही तर पडद्यामागून का होईना पण ते राजकारणात सक्रिय होतेच.  त्यामुळे मिठाच्या सत्याग्रहातून सुटलेल्या ३५ जणांचा त्यांनी पतितपावन मंदिरामध्ये सत्कार करुन सहभोजनाचा कार्यक्रम केला. सावरकरांच्या  सानिध्यात कित्येक वर्षे राहिलेले  आत्माराम गणपत साळवी एके ठिकाणी  लिहितात, ‘वर-वर समाजकार्य करणारे सावरकर त्यांना योग्य मनुष्य भेटला की त्याच्याबरोबर सशस्त्र क्रांतीचीही  चर्चा करत असत.’ 

           पण या बरोबरच सावरकरांनी जिल्ह्याचा मुख्य अधिकारी, पोलिस खाते यामध्ये आपली विश्वासू माणसे पेरली होती. त्यामुळे तेथील सर्व बातम्या सावरकरांना अगदी  तंतोतंत कळत असत.  पण इकडच्या  मात्र काही ठराविकच बातम्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत.  त्यावेळचे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी गिलीगन व पोलीस अधिकारी ओ’सलिवन यांनी सावरकरांना एखाद्या आरोपात अडकवून परत अंदमानला पाठवण्यासाठी  नाना प्रयत्न  करुन पहिले. पण त्यात त्यांना काही यश आले नाही. 

           असे असून  देखील  रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिरात सावरकर अनेक सभांचे आयोजन करत. निम्मित असायचे ते म्हणजे कोणा  महापुरुषाची पुण्यतिथी अथवा जयंती किंवा काही धार्मिक समारंभ. अशा  कार्यक्रमांमध्ये सावरकर उघडपणे उपस्थित देखील राहत नसत. पण सर्वांना माहीत असायचे की, यामागे विनायक दामोदर सावरकर हेच आहेत.

          सेनापती बापट, पृथ्वीसिंग आझाद अशी काही मंडळी काही काळासाठी क्रांतीचा मार्ग सोडून वेगळे झाले होते. पण सावरकरांच्या सानिध्यात येताच परत ही मंडळी सशस्त्र क्रांतीसाठी प्रेरित झाली.  सेनापती बापट एका भाषणात म्हणाले, ‘ब्रिटिशांचे राज्य उलथवून टाकणे सशस्त्र क्रांतीशिवाय शक्य नाही.’ पुढे याच एका वाक्यासाठी बापटांना अक्षरशः सात वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागली. पण तरीही ते मागे हटले नाहीत.

         सायमन कमिशनच्या आंदोलनात सँडहर्स्ट या पोलीस अधिकाऱ्याने लाला लजपतरायांच्या छातीवर काठी मारली व त्यामधेच  १७ नोव्हेंबर  १९२८  रोजी त्यांचे निधन झाले.  याबद्दल सावरकरांनी आपले विचार मोघे नावाच्या आपल्या अनुयायाकडून  सभेत वाचून घेतले.  ‘लालाजींच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी कार्यक्षेत्रात उतरा’ असा लेख देखील सावरकरांनी लिहिला आणि याचाच परिणाम म्हणून मुंबईत लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनचे इंग्रज अधिकारी टेलर यांच्यावर वैशंपायन व मोघे यांनी गोळीबार केला आणि नंतर पुण्यामध्ये हॉटसन या अधिकाऱ्यावर वासुदेव बळवंत गोगटे यांनी गोळीबार केला. 

        थोडक्यात येथेही सावरकरांच्या देशकार्यात खंड पडला नव्हता. पण या काळात रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असल्यामुळे सावरकरांची आर्थिक स्थिती मात्र अतिशय हलाकीची होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्यामुळे त्यांची ‘बॅरिस्टर’ ही पदवी तर ब्रिटिश सरकारने रद्द केलीच होती व नंतर त्याच धर्तीवर मुंबई विद्यापीठाने त्यांची ‘बी. ए.’ ही पदवी सुद्धा रद्द केली होती.  त्यामुळे सावरकरांना आपल्या चरितार्थासाठी वकिली करणे किंवा कोणताही अन्य  व्यवसाय करणे शक्य नव्हते.  त्यामुळे अर्थार्जन करण्याचा कोणताही स्त्रोत त्यांच्याकडे नव्हता. मुळात अशा राजकीय गुन्ह्यासाठी शिक्षा झालेल्या लोकांना सरकारकडून भत्ता मिळत असे.  पण सावरकरांना कित्येक वर्षे हा भत्ताही नाकारला गेला होता. काहीशा अर्थार्जनासाठी नंतर सावरकरांनी ‘संगीत उ:शाप’ आणि ‘संगीत संन्यस्त खङग’ ही दीनानाथ मंगेशकरांसाठी अजरामर संगीत नाटके लिहिली.

            त्याकाळच्या समाजा-समाजामध्ये द्वेष मोठ्या प्रमाणावर पसरलेला होता.  या द्वेषाविरुद्धच सावरकरांनी प्रचंड मोठा लढा दिला.  रत्नागिरीचे पतित-पावन मंदिर त्यांनी आंदोलन करून सर्व जातींसाठी खुले केले.  यानंतर सर्व जातींच्या लोकांना बरोबर घेउन  सहभोजन, सर्व जातींच्या  मुला-मुलींना एकत्र शिक्षण, कोणताही भेद न करता घरोघरी दसरा व संक्रांतीला जाऊन सोने व तिळगुळ वाटप, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांकडून भजनी व कीर्तन मंडळे स्थापन करणे अशी एक ना अनेक समाजसुधारणेची कामे त्यांनी केली. 


         सावरकरांच्या या समाजकार्याचे त्या वेळच्या काही मान्यवरांनी देखील कौतुक केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रांमध्ये तुम्ही जे काम करत आहात.  त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे.  जर अस्पृश्य वर्ग हिंदू समाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल तर, नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही. चातुर्वर्णाचे उच्चाटन झाले पाहिजे.  ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे.यापैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो.’

        प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, ‘हिंदुंची संघटना होणे आवश्यक आहे हा सिद्धांत पटल्यावर  जात्युच्छेदनाचा कार्यक्रम कितीही तापदायक असला तरी तो हाताळल्याशिवाय गत्यंतर नाही. यादृष्टीने सावरकरांचा प्रयत्न अभिनंदनास पात्र आहेत.’

        त्यानंतर जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा ब्रिटिशांना सैनिकी मदत करण्याची वेळ आली, तेव्हा गांधी व नेहरू हे दोघेही ब्रिटनला विनाशर्त मदत करण्यास तयार होते.  याचाही सावरकरांनी कडाडून विरोध केला.  त्याबरोबरच जपानमध्ये जाऊन भारतासाठी क्रांतिकारी कार्य करणारे रासबिहारी बोस आणि सावरकर यांचा अनेकदा पत्रव्यवहार होत असे.  रासबिहारी बोस सावरकरांच्या साहित्याने व कार्याने  इतके प्रभावित होते की, त्यांनी १९३९ मध्ये सावरकरांवर जपानी भाषेत ‘Savarkar: Rising Leader of New India: His Career and Personality’ हा  लेख लिहिला होता.  त्यानंतर २२ जून १९४०  रोजी सुभाषबाबू सावरकरांना भेटायला दादरला ‘सावरकर सदन’ या त्यांच्या घरी आले होते.  त्यावेळेस या दोन बड्या नेत्यांची  तब्बल अडीच तास चर्चा झाली. त्यावेळी सावरकर म्हणाले, ‘ब्रिटिशांच्या तावडीतून सुटून जपान-जर्मनी ला जावे.  इटली-जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्त्रावधी भारतीय सैनिकांचे पुढारीपण उघडपणे स्वीकारावे.  हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करावी आणि जपान युद्धात पडताच साधेल  त्या मार्गाने ब्रिटिश सत्तेवर बाहेरून स्वारी करावी. असा पराक्रम नि साहस करण्यासाठी जी २-३ माणसे मला  समर्थ दिसतात त्यात एक आपण आहात.’ असाच सल्ला प्रेसिडेन्सी तुरूंगात असताना सुभाषबाबूंना हेम घोष यांनीही दिला होता. 


          यानंतरच सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटून पुढे जपान आणि सिंगापूरमध्ये ‘आझाद हिंद सेना’ उभारली व एक नवा इतिहास घडवला. 

          एकूणच काय तर आपल्या आयुष्यामध्ये सतत कार्यरत राहण्याची वृत्ती व देशकार्याचे वरदान घेऊनच सावरकर जन्माला आले होते.  राजकारण नाही तर समाजकारण केले.  समाजकारण करता-करता साहित्याचीही उपासना केली.  असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणे तसे फारच दुर्मिळ.

         पण तरीही या अशा व्यक्तिमत्त्वाची स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशामध्ये उपेक्षाच केली गेली.  सावरकरांवर विनाकारण अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. गांधी हत्येमध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न देखील झाला. नक्की काय होते हे प्रकरण? सावरकरांनी स्वतंत्र भारतासाठी त्याकाळी काही सुधारणा सुचविल्या होत्या. पण काही लोकांच्या नाहक हट्टपायी त्यांची अंमलबजावणी केली गेली नाही. पण त्याचे परिणाम आपण कित्येक वर्षे भोगत आहोत. नक्की काय होत्या त्या सूचना? हे सारे आपण पुढील लेखामध्ये पाहू. 

- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी  

         theleadingphase.com/apoorvkulkarni





Comments

Popular posts from this blog

सावरकर एक विचारधारा - भाग ५

Part 11 -Savarkar : The Conclusion