सावरकर एक विचारधारा - भाग ५

  मागील भागात आपण पाहिले की, विनायक सावरकर लंडनच्या राजकारणामध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले होते.  याच काळात सावरकरांची दोन पुस्तकेही खूप गाजली होती. ही पुस्तके प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजे बाबाराव सावरकरांना अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षाही झाली होती. त्याचे पडसाद नाशिक पासून ते अगदी लंडन पर्यंत जाणवले होते. तसेच १३ मार्च १९१० रोजी सावरकरांनी पॅरिस वरून लंडनमध्ये पाउल ठेवल्याबरोबर  त्यांना अटक करून ‘बो स्ट्रीट’ पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले होते.


          सावरकरांना आता आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे दिसतच होते.  सावरकरांना अटक झाली आहे हे कळल्याबरोबर लंडन मध्ये खळबळ उडाली. त्यांचे लंडनमधील सहकारी व्ही. व्ही. एस्.अय्यर यांनी सावरकरांना जामीन मिळावा यासाठी खटाटोप चालू केला होता. त्यासाठी सावरकर बचाव समितीची स्थापना करण्यात अली होती आणि त्याचे अध्यक्षपद होते ते म्हणजे लंडनमध्ये  ‘वर्ल्ड’ हे वृत्तपत्र चालवणारे गाय आल्ड्रेड या ब्रिटिश माणसाकडे.  या वेळेपर्यंत एक तर नक्की होते की, सावरकरांना जर या खटल्यासाठी भारतात पाठवले तर त्यांना शिक्षा नक्कीच होणार होती. त्यामुळे शक्य तितके दिवस त्यांना लंडनमध्येच ठेवण्याचे प्रयत्न त्यांच्या साथीदारांनी चालवले होते. 


         २४  मार्च रोजी मुंबईहून चार पोलीस सावरकरांना भारतात परत घेऊन येण्यासाठी निघाले होते व ते लंडनला ९ एप्रिल रोजी पोहोचणार होते.  त्यामुळे जे काही करायचे ते ९ एप्रिलच्या आतच. दरम्यानच्या काळात सावरकरांना जेलमधून पळवून तेथून बोटीने जर्मनीला घेऊन जाण्याचे ही प्रयत्न करण्यात आले. परंतु ते यशस्वी झाले नाहीत. कारण सावरकर ही काय चीज आहे हे एव्हाना ब्रिटिश सरकारच्या लक्षात आले होते.  त्यामुळे त्यांच्याभोवती कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती. 


         शेवटी लंडनच्या कोर्टाकडून अपेक्षित तो  निर्णय आला.  कोर्टाने सावरकरांना हिंदुस्तान सरकारकडे हस्तांतरित केले होते. आता सावरकरांना बोटीने पुन्हा भारतात नेले जाणार हे नक्की होते. लंडनहुन मुंबईला जाणारी प्रत्येक बोट मार्सेलिस ला नक्कीच थांबत असे. त्यामुळे मादाम कामा, राणा सिंग आणि अय्यर यांनी सावरकरांना मार्सेलिस मधून पळवून नेण्याचा बेत आखला. 


        अखेर १ जुलै १९१० म्हणजे सावरकर लंडनमध्ये आल्यापासून बरोबर चार वर्षांनी ‘मोरिया’ नावाच्या बोटीवर चढविण्यात आले. ही बोट ८ जुलै ला मार्सेलिसच्या किनाऱ्याजवळ येऊन उभी राहिली. पण इतर प्रवाश्यांप्रमाणे सावरकरांना काही मार्सेलिसच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी परवानगी नव्हती .पण बेत ठरल्याप्रमाणे किनाऱ्यावर जाणे तर आवश्यक होते. पण आता या अथांग सागरातून  किनाऱ्यावर जायचे कसे हा प्रश्न सावरकरांसमोर उभा होता. 


Sketch by Darshan Rathi

       मार्सेलिसच्या किनाऱ्यावर जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे, मार्सेलिस ही फ्रेंच भूमी होती आणि फ्रान्स आणि इंग्लंड मध्ये कैदी हस्तांतरणाचा कोणताही करार झालेला नव्हता. त्यामुळे फ्रेंच सरकारने सावरकरांना आश्रय दिला तर ब्रिटिश सरकार काहीही करू शकत नव्हते. त्यामुळे कैदेतून सुटायचे असेल तर किनारा गाठणे अत्यंत गरजेचे होते. 


      सावरकरांच्या एक लक्षात आले की बोटीच्या शौचालयाला जे पोर्ट होल आहे. त्याची खिडकी उघडली जाऊ शकते आणि आपण तेथून उडी मारू शकतो. सावरकरांनी पटकन आपल्या गळ्यातील जानव्याने आपल्या छातीचे व पोर्ट होलचे माप घेतले. ते अगदी सारखे होते. मग बेत ठरला तर योग्य वेळ पाहून समुद्रात उडी मारायची. 

      दुसर्‍या दिवशी सकाळी शौचास जाण्याच्या निमित्ताने सावरकर गेले. दारावरील छोट्या खिडकीला आपला अंगरखा लावला जेणे करून आत काय चालले आहे हे कळू नये आणि थेट या पोर्ट होल  मधून समुद्रामध्ये उडी मारली.  ही उडी मारताना खिडकीच्या काचा त्यांच्या छातीला लागल्या. उडीचा आवाज येताच सावरकरांच्या पहार्‍यावर असणारे चारही पोलिस ऑफिसर चांगलेच घाबरले. पण एव्हाना सावरकर पोहत-पोहत मार्सेलिसच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचले होते.


     पण सावरकरांच्या पाठोपाठ ब्रिटिश पोलीसही किनार्‍यावर आले व तेथील  फ्रेंच सरकारच्या पोलिसांना दमदाटी व लाच देउन त्यांनी सावरकरांना परत आपल्या ताब्यात घेतले.  सावरकरांना परत बोटीवर नेत असतानाच मॅडम कामा आणि मंडळी तेथे पोहोचले. त्यांना झालेल्या फक्त अर्ध्या तासाच्या फरकाने हा साहसी  बेत फसला. पण ही उडी मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मुद्दा बनली व अजरामर झाली. 


       अखेर २२ जुलै रोजी सावरकरांना मुंबईत आणले गेले. सावरकरांवर एकूण ३ खटले भरण्यात आले :

  1. राजद्रोह त्यात सावरकरांबरोबरच अजून 38 लोकांचा समावेश होता. 

  2.  ब्रिटिश राजसत्तेविरूद्ध युद्ध पुकारले याबद्दल. 

  3. जॅक्सनच्या खुनाला मदत केल्याबद्दल. 


Sketch by Darshan Rathi

 

       न्यायाधीश बोरील स्कॉट यांच्या खंडपीठासमोर हा खटला उभा राहिला. अर्थातच सावरकरांना यातून कोणत्याही प्रकारची सूट मिळेल ही अपेक्षा नव्हतीच. कारण ब्रिटिश सरकारला सावरकरांना पकडण्यासाठी काहीतरी कारणच हवे होते आणि  ते त्यांना मिळाले इतक्या कष्टाने मिळाले होते. १९ जुलै १९१० रोजी  आंतरराष्ट्रीय न्यायालयात  फ्रेंच सरकारने सावरकर हे आपल्या भूमीवर आले होते आणि ब्रिटिश सरकारने त्यांना आमच्या परवानगी शिवाय अटक केले आहे. त्यामुळे सावरकरांना फ्रेंच्यांच्या स्वाधीन करावे असा तगादा लावला होता. पण ब्रिटिशांसमोर फ्रेंच सरकारचे फार काही चालले नाही. 


        २४ डिसेंबर १९१० रोजी सावरकरांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अंदमानच्या काळ्या पाण्याची २५ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच ३० जानेवारी १९११ रोजी बाकीच्या दोन आरोपाबद्दल देखील आणखी एक जन्मठेप ठोठावण्यात आली.  ती ही पहिली संपल्यावर दुसरी म्हणजेच एकाच माणसाला दोन जन्मठेप म्हणजे तब्बल ५० वर्षांची जन्मठेप.


         जगाच्या इतिहासात एकाच मनुष्याला दोन जन्मठेप देण्याचा हा पहिलाच प्रकार.पन्नास वर्षाचा अंदमानच्या काळ्या  पाण्याचा कठोर कारावास आता सावरकरांच्या नशिबी आला  होता. सावरकरांना अंदमानला हलवायची तयारी होऊ लागली. सावरकरांना डोंगरी इथल्या तुरुंगात नेण्यात आले.  तेव्हा तेथील एक हवालदार त्यांना चेष्टेने म्हणाला, ‘काही काळजी करू नका सावरकर. आपले सरकार खूप दयाळू आहे. ते  तुम्हाला बरोबर तुमची शिक्षा संपली की सोडून देईल’.  त्यावर सावरकर त्याला म्हणाले, ‘मृत्यू त्याहीपेक्षा दयाळू आहे.  कदाचित मला तो त्या आधीच सोडवेल’.  सावरकरांना कैद्याचे कपडे देण्यात आले.  कैद्याचा बिल्ला देण्यात आला. त्यावर सुटकेची तारीख लिहिली होती २४ डिसेंबर १९६०.


          विनायक दामोदर सावरकर या पेटत्या ज्वालेसामोर आता होता तो फक्त आणि फक्त ५० वर्षांची काळ कोठडी ५० वर्षांचा quarantine time.

          मुळात अंदमानला गेलेला माणूस कधीच परत येत नाही हा त्यावेळचा समज  होता. मग आता विनायक सावरकरांचे काय होणार? ‘अभिनव भारत’ चे  काय होणार?  या पेटवलेल्या स्वातंत्र्य युद्धाचे  काय होणार? आता खरोखरच विनायक सावरकर या व्यक्तीचा हा अंत म्हणावा का?

             

पण हे शक्य नव्हते कारण,

              अनादी मी अनंत मी अवध्य मी भला 

मारिल रिपु जगति असा कवण जन्माला

                           (वि.दा.सावरकर यांचीच ‘अनादी मी...’ ह्या कवितेतील काही ओळी)


          हे सूत्र अंगिकारले हे विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या अंदमानातील आपल्याला आणखीनच थक्क करून टाकणाऱ्या कहाण्या आपण पुढील लेखामध्ये पाहू. 


- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी 


Comments

  1. लेख खूप छान .

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सुंदर लेख लिहिले आहेस अपूर्व, खरंच अभ्यासपूर्ण आणि आताच्या जनरेशनला सावरकर कळण्यासाठी उत्तम पर्याय👌👌👏👏

      Delete
  2. खूप छान लिहीले आहेस अपूर्व.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर एक विचारधारा भाग 9

Part 11 -Savarkar : The Conclusion