सावरकर एक विचारधारा - भाग ४
Sketch by Darshan Rathi |
मागील भागात आपण सावरकरांचा नाशिक ते पुणे, पुणे ते मुंबई आणि मुंबई ते थेट लंडन असा प्रवास पाहिला. पुणे आणि मुंबई येथे ते आधीच हळू-हळू राजकारणात सक्रिय होण्यास सुरुवात झाली होती. एक तरुण व धडाडीचे नेतृत्व म्हणून सावरकर सर्वांना परिचित होण्यास सुरुवात झाली होती. सावरकर बॅरिस्टर चे शिक्षण घेण्यासाठी ९ जूनला लंडनला यायला निघाले व ३ जुलै १९०६ रोजी ते लंडनमध्ये पोहोचले.
लंडनला पोहोचल्या बरोबर सावरकरांनी ‘ग्रेज इन’ या कॉलेजमध्ये बॅरिस्टरीच्या शिक्षणासाठी आपले नाव नोंदवले. सावरकरांच्या पाठोपाठ दोनच दिवसांनी मुंबई सरकारचा विशेष अहवाल ‘इंडिया ऑफिस’ मध्ये येऊन थडकला. ज्यात लिहिले होते, ‘विनायक दामोदर सावरकरांवर नजर ठेवा.’ तेव्हा ‘इंडिया ऑफिस’ ने ‘ग्रेज इन’ कॉलेजमध्ये चौकशी केली. पण त्यांना फारसे काही आक्षेपार्ह आढळले नाही. कारण, ह्या तुफानाने अजून लंडनमध्ये आपला वेग पकडला नव्हता.
विनायकावर मॅझिनीच्या चरित्राचा प्रचंड प्रभाव होता आणि पाहायला गेले तर मॅझिनी आणि सावरकर यांच्या व्यक्तिमत्वातही बरेच साम्य होते. त्यामुळे त्यांनी लंडनला पोहोचल्या बरोबर मॅझिनीच्या आयुष्यावर लिहिलेले सहा खंड वाचून काढले. या धगधगत्या अग्नी सारख्या मॅझिनीचे चरित्र आपल्या देशातील लोकांना ही कळायला हवे यासाठी सावरकरांनी मॅझिनी मराठीत लिहायला घेतला.त्यावर त्यांचा सखोल अभ्यास व लिखाण चालू झाले व पुढील तीन महिन्यात ‘जोसेफ मॅझिनी : आत्मवृत्त नि राजकारण’ हे पुस्तक लिहून पूर्ण झाले. ते भारतामध्ये नाशिकला त्यांचे जेष्ठ बंधु गणेश सावरकर (बाबाराव) यांच्याकडे प्रसिद्ध करण्यासाठी पाठवण्यात आले. बाबाराव सावरकरांनी या पुस्तकाची २००० प्रतींची प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. पण त्या काही काळातच विकल्या गेल्या. या पुस्तकाची प्रस्तावना अतिशय प्रेरणादायी होती ती सगळीकडे इतकी गाजली होती की, ती कित्येक तरुणांनी त्यावेळेस मुखोद्गत केली होती.
मॅझिनी नंतर सावरकरांनी १८५७ च्या उठावावर लिखाण करण्यास चालू केले होते. पण या बाबत फारच कमी साहित्य उपलब्ध होते. तेव्हा श्यामजी कृष्णवर्मानी सावरकरांना सुचवले की, ‘तुम्ही ‘इंडिया ऑफिस’ च्या ग्रंथालयात जा तिथेच तुम्हाला १८५७ चे सर्व मूळ कागदपत्रे पाहायला मिळतील.’ सावरकरांनी महत्प्रयासाने तेथे प्रवेश मिळवला व अनेक मूळ दस्ताऐवज व पुस्तके यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ पूर्ण केला. पण या आधीच ‘जोसेफ मॅझिनी : आत्मवृत्त नि राजकारण’ या पुस्तकाने भारतातील ब्रिटिश सरकारने प्रक्षोभक साहित्य या नावाखाली बंदी आणली होती. त्यामुळे
सावरकरांच्या वडील बंधुनी अनेक खटाटोप करूनही हा नवीन ग्रंथ भारतात प्रसिद्ध करणे शक्य होईना. म्हणून तो इंग्रजीमध्ये भाषांतरित करून ‘INDIAN WAR OF INDEPENDENCE 1857’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आला.
आतापर्यंत सावरकरांचे लंडनमध्ये बरेच नाव झाले होते. त्यांचे नेतृत्व जवळ-जवळ सर्वांनीच मान्य केले होते. अगदी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी देखील ‘अभिनव भारत’ ची शपथ घेतली होती. सावरकरांनी लंडनमध्ये ‘फ्री इंडिया’ नावाची आणखी एक संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत भारतीय सण व उत्सव साजरे केले जात. सावरकरांनी तेथे हे शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजरे करणे सुरू केले. यामध्ये सावरकरांनी अनेक विविध विषयांवर भाषणे करीत असत व ती भाषणे ऐकायला अनेक श्रोते उत्साहाने येत असत. थोडक्यात ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने ही एक निरुपद्रवी अशी संस्था होती.
याच संस्थेमार्फत त्यांनी १८५७ च्या उठावाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष लंडनमध्ये आयोजित केले. त्यांच्या या धडाडीच्या नेतृत्वामुळे व उत्साहामुळे आपसूकच ‘इंडिया हाऊस’ चे नेतृत्व विनायक दामोदर सावरकर त्यांच्याकडे आले. त्यामुळे आता हळूहळू ‘इंडिया हाऊस’ च्या वरच्या माळ्यावर आता ‘अभिनव भारत ’ चे अनेक कार्यकर्ते बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या ‘पिक्रिक ऍसिडचे’ खेळ खेळले जाऊ लागले.
मुळात ‘अभिनव भारत’ हा एक प्रक्षुब्ध रसगोलक तर ‘फ्री इंडिया सोसायटी’ हे त्याचे एक शांत व संरक्षक कवच होते. ‘फ्री इंडिया सोसायटी’ भाषणे व उत्सव होत असत, आणि खरे क्रांतिकारी कार्य ‘अभिनव भारत’ मध्ये चालू असत.
इतक्यात ब्रिटिश सरकारने एक वेगळीच आगळीक केली. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकावर ब्रिटिश सरकारने प्रकाशना आधीच बंदी घातली. एखादे पुस्तक प्रकाशित होण्या अगोदरच त्यावर बंदी घालण्याचा हा जगातील एकमेव प्रसंग असेल. पण मुळात ‘सावरकर’ या नावाचेच ब्रिटिश सरकारमध्ये इतकी भीती बसली होती की, ‘सावरकर’ या नावाखाली जे काही येत असेल त्यावर बंदी घालण्याचे सरकारचे प्रयत्न असत. यावर लंडनच्या वृत्तपत्रांनी देखील प्रचंड टीका केली की, ‘जे पुस्तक अजून प्रकाशितच झाले नाही. त्यातील मजकूर सरकारने आक्षेपार्य कसा ठरवला?’.
इकडे भारतात मुंबईमध्ये गणेश सावरकरांना (बाबाराव) ‘प्रक्षोभक व खुनाला प्रोत्साहन देणारे साहित्य’ प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व पुढे त्यांना त्या खटल्यांमध्ये अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. भारतातील ब्रिटिश सरकारला ‘मॅझिनी’ चा लेखक म्हणजे विनायक सावरकर हवे होते. पण ते हाताला लागत नसल्याने त्यांनी गणेश सावरकरांना अटक केली.
गणेश सावरकरांच्या या अटकेमुळे बरीच खळबळ माजली. बऱ्याच लोकांमध्ये अत्यंत क्रोधाची भावना निर्माण झाली. बाबाराव सावरकरांना झालेली शिक्षा मदनलाल धिंग्रा च्या जिव्हारी लागली होती. मदनलाल धिंग्रा सावरकरांना आपले गुरूच मानत असे. पण गमतीचा भाग म्हणजे मदनलाल धिंग्रा हा जसा सावरकरांना भेटायला ‘इंडिया हाऊस’ मध्ये येत असे, तसाच तो कर्झन वायली ला भेटायला ‘इंडिया ऑफिस’ मध्येही जात असे. त्यामुळे कर्झन वायलीला हा आपलाच माणूस असल्याचे वाटत होते. पण बाबांच्या अटकेमुळे मदनलाल धिंग्रा हा अतिशय चिडलेले होता. ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ च्या एका कार्यक्रमांमध्ये कर्झन वायली उपस्थित राहणार होते. त्यामुळे तेथे मदनलाल धिंग्रा ही गेले. कार्यक्रम अगदी रात्री अकरा वाजेपर्यंत रंगला होता. त्यानंतर कर्झन वायली जायला निघाले. तेव्हा मदनलाल धिंग्राने जवळ जाऊन त्यांच्यावर चार गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्याला अटक करण्यात आले. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, एक सुरा, एक खंजीर व खिशामध्ये ‘खून का केला याचे निवेदन’ सापडले. हे त्याचे निवेदन ब्रिटिश सरकारने दाबून टाकण्याचा बराच प्रयत्न केला. पण बरोबर मदनलाल धिंग्रांच्या फाशीच्या एक दिवस आधी म्हणजे १६ ऑगस्ट ला हे निवेदन अमेरिकेसकट साऱ्या जगामध्ये सावरकरांनी प्रसिद्ध केले. ब्रिटिश सरकारला हे बॉम्ब आणि बंदुकांचे आवाज काही नवीन नव्हते. पण ते आतापर्यंत पुणे, कलकत्ता, मुजफ्फरनगर अशा फक्त भारतातील शहरातच ऐकले होते. पण आता, आता तर ते थेट लंडनमधेच म्हणजे हा ब्रिटिश राजसत्तेला हा मोठा धक्का होता. अखेर १७ ऑगस्ट १९०९ रोजी सकाळी ९ वाजता मदनलाल धिंग्रा अनंतात विलीन झाले. या स्वातंत्र्याच्या यज्ञात आणखी एक आहुती पडली.
Sketch by Darshan Rathi |
मदनलाल धिंग्रा च्या या निवेदनातून अनेक तरुण पेटून उठले. त्यातूनच अजून एक असाच किस्सा घडला तो म्हणजे नाशिकमध्ये. बाबाराव सावरकरांना अटक झाल्याबद्दल नाशिकमध्येही प्रचंड असंतोषाचे वातावरण होते. त्यामुळे तिथला कलेक्टर जॅक्सन याचा खून करण्याचा घाट अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांनी आखला.
Sketch by Darshan Rathi |
जॅक्सनची नाशिकहुन मुंबईला बदली झाली होती. त्याचा नाशिक मधला शेवटचा दिवस होता. त्यामुळे तो ‘किर्लोस्कर नाटक कंपनी’ चे बालगंधर्व काम करत असलेले ‘शारदा’ हे नाटक पाहायला थिएटरमध्ये गेला व तेथेच अनंत कान्हेरे तिशीतल्या तरुणाने त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. यासाठी १९ एप्रिल १९१० रोजी अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
इकडे सावरकर कुटुंबाची तर अगदी वाताहतच चालू होती. थोरले बंधू बाबाराव सावरकरांना अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा झालेली, मधले विनायक सावरकर लंडनमध्ये आणि धाकटे नारायणराव ही पोलिसांच्या ताब्यात, घरी उरली होती ती फक्त येसूवहिनी. सरकारने सावरकरांच्या घरावरही जप्ती आणली आणि घरातील अक्षरशः पूजेच्या भांड्यात सकट सरकारने सर्व काही जप्त केले होते. याबद्दल धीर देताना विनायक सावरकर आपल्या वहिनींना लिहितात:
तू धैर्याची अससी मूर्ति । माझे वहिनी माझे स्फूर्ति।
रामसेवाव्रताची पूर्ति । ब्रीद तुझे आधीच॥
महत्कार्याचे कंकण धरिले। आता महत्तमत्व पाहिजे बाणले |
ऐसे वर्तन पाहिजे केले। की जे पसंत पडले संतांना॥
या काळापर्यंत एकतर ‘सावरकर’ हे नाव संपूर्ण युरोपभर प्रसिद्ध झाले होते. ब्रिटीश सरकारलाही सावरकर या व्यक्तीच्या शक्तीचा अंदाज आता आला होता. त्यामुळे सावरकरांना अटक करण्याची संधीच ब्रिटिश सरकार शोधत होते.
एकदा सावरकर काही कामानिमित्त पॅरिसला गेले होते. तेथे त्यांना कळले की ते हाताला लागत नाहीत, म्हणून ब्रिटिश सरकारने भारतामध्ये सावरकरांच्या आप्त-जनांचा छळ मांडला होता. बाबाराव सावरकरांच्या काळ्या पाण्याची शिक्षाही हायकोर्टाने कायम केली होती. त्यामुळे सावरकर तातडीने पॅरिसवरून लंडनला यायला निघाले. आपण लंडन मध्ये पोहोचताच आपल्याला अटक होईल याचा त्यांना अंदाज होताच.
१३ मार्च १९१० रोजी लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशनमध्ये ते उतरले. सावरकर तिथे पोहोचायच्या आतच मॅकार्थी आणि पार्कर हे दोन इन्स्पेक्टर तिथे त्यांची वाट पाहत होते. सावरकर आल्या-आल्या त्यांना अटक करण्यात आले. ‘राजद्रोह करणे आणि खुनाला प्रोत्साहन देणे’ असे दोन आरोप विनायक दामोदर सावरकर यांच्यावर ठेवण्यात आले होते. सावरकरांनी त्यांना एवढेच विचारले, ‘’आता कुठे जायचे आपण?’’. अटक करून सावरकरांना लंडनच्या बो स्ट्रीट पोलीस स्स्टेशनमध्ये नेण्यात आले. ही बातमी कळताच सकाळी लंडनमध्ये ही हालचाली सुरु झाल्या.
शेवटी ज्याची भीती होती तेच घडले होते. आता ‘अभिनव भारत’ चे पुढे काय ? या पेटलेल्या स्वातंत्र्यलढ्याचे पुढे काय होणार? ह्या अटकेमुळे सावरकर इथेच संपणार का? असे एक ना अनेक प्रश्न असतील आपल्या मनामध्ये.
बो स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये पुढे काय झाले? सावरकरांना कुठे नेण्यात आले? हे सारे आपण पुढील लेखात पाहुयात.
- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी
खूप छान लिहिले आहेस.पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक.
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDeleteखूप छान अपूर्व
ReplyDelete