सावरकर एक विचारधारा - भाग ३
मागील लेखात आपण पाहिले की विनायक दामोदर सावरकरांचे बालपण कुठे व कसे गेले ? छोट्या विनायक मध्ये मुळातच असलेला 'स्वातंत्र्यवीर' जागा होण्यासाठी नक्की कोणती घटना महत्त्वाची ठरली ? त्यातून त्यांनी पुढे जाऊन वयाच्या अवघ्या 16-17 व्या वर्षी 1 जानेवारी 1900 साली ‘मित्रमेळा’ ही गुप्त क्रांतिकारी संघटना नाशिक येथे कशी स्थापन केली ? त्याचे प्रेणस्थान काय होते ?
आता आपण पुढील कथा पाहू,१९०१ साली नाशिकला विनायकाचा यमुना चिपळूणकर या मुलीशी विवाह झाला. पुढे वर्षभर नाशिक मध्येच राहून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. आता पुढील शिक्षणासाठी म्हणून १९०२ साली सावरकरांनी नाशिक सोडले आणि ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. १९०२ च्या काळातील पुणे म्हणजे भारतीय राजकारणाचे केंद्र. स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व करणाऱ्या लाल-बाल-पाल (लाला लजपतराय-बाळ गंगाधर टिळक-बिपीनचंद्र पाल) या त्रिकुटा पैकी बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक हे पुण्याचेच. त्यामुळे पुण्यात स्वातंत्र्य लढ्याची ऊर्जा आणि हवा काही वेगळीच होती अगदी या विनायकाला हवी होती तशीच. त्याकाळात पुण्यातील विनायकाची आकर्षणे आणि प्रेरणास्थाने म्हणजे लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे आणि अर्थात हुतात्मा चापेकर बंधू.
सावरकरांना मुळातच वाचनाचा छंद दांडगा होता. तो पुण्यात आणखीनच वाढला. पूर्वी सावरकरांनी बरीच मराठी पुस्तके वाचली होती.पण आता मराठी बरोबरीने इंग्रजीचे वाचन ही वाढू लागले. विनायकाला एकदा कोणीतरी म्हणाले, “अरे तू काय ब्रिटिश साम्राज्याशी लढण्याच्या गोष्टी करतोस ? त्यांच्या सारख्या बलाढ्य साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत देखील नाही. तू कसा काय त्याच्याशी झुंज देणार ? त्यावर विनायक त्याला म्हणाले,
जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही
उद्विग्न- मानस निराशही जे तयारी
हे पाहिजे स्वमनि चिंतन नित्य केले
विश्वात आजवरि शाश्वत काय झाले?
या प्रगल्भतेने हळूहळू स्वातंत्र्य संग्रामाची ही बीजे घट्ट होत होती. फर्ग्युसन महाविद्यालयात मध्ये असताना सावरकरांच्या हाती ‘मॅझिनी’ चे चरित्र पडले आणि बघता बघता विनायक प्रेरित झाला आणि त्याची विचारसरणीच बदलून गेली. असा हा बदल घडवणारा ‘मॅझिनी’ नक्की आहे तरी कोण ? हा ‘मॅझिनी’ आहे तरी उठला आणि त्याने नेमके केले तरी काय ?
तर ‘मॅझिनी’ मूळचा इटलीचा. इटलीच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या उद्गाता. इ. स. १८०० च्या काळात इटली मध्ये फ्रेंचांचे प्रभुत्व होते. तेव्हा मॅझिनीने अगदी एकट्या पासून सुरुवात करून हळू-हळू संघटना मोठी करत-करत इटलीला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. हा अतिशय रोमांचक असा इतिहास आहे. ह्या वर विनायक विचार करत होता,’आपल्यालाही असेच हिंदुस्तानचे ‘मॅझिनी’ होता आले. तर त्यासारखे आयुष्याचे दुसरे काहीच सार्थक नाही.‘
सावरकरांना त्यांच्या गुप्त क्रांतिकारी संघटनेचे ‘मित्रमेळा’ हे मुळ-मुळीत नाव मुळीच आवडले नव्हते. काही साथीदारांच्या आग्रहामुळे त्यांनी हे नाव ठेवले होते. पण आता ‘मॅझिनी’ वाचल्याने त्यांची विचारसरणी स्वातंत्र्याबाबत अधिकच आक्रमक झाली होती. जशी मॅझिनीची ‘यंग इटली’ नावाची गुप्त संघटना होती. तसेच सावरकरांनी आपल्या गुप्त क्रांतिकारी संघटनेचे नाव ‘मित्रमेळा’ बदलून ‘अभिनव भारत’ असे केले.
विनायक आता हळू-हळू पुण्याच्या राजकारणात सक्रिय व्हायला सुरुवात झाली होती. तो महाविद्यालयातील मुलांच्या सभा घेत असे आणि श्रोतेही त्या आवडीने ऐकत असत. एका वर्षी दसऱ्याच्या दिवशी सावरकरांनी लोकमान्य टिळक आणि ‘काळ’ मासिकाचे संपादक शिवरामपंत परांजपे यांच्या उपस्थिती मध्ये गाडीभर विलायती कपड्यांची भारतातील पहिली होळी पेटवली आणि स्वदेशीचा नारा दिला. अर्थातच याचा काही ब्रिटिशांच्या व्यापार्यावर थेट परिणाम होईल अशी काही अपेक्षा नव्हती. पण त्याचा व्हायचा तो परिणाम नक्कीच झाला. सर्व अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली की, पुण्यात काय चालले आहे. याकडे सरकारचे लक्ष आहे की नाही ? ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.
पण याचा परिणाम असा झाला की, यामुळे सावरकरांना महाविद्यालयातून दहा रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि तातडीने वस्तीगृह सोडायला सांगितले. यावरच टिळकांनी फर्ग्युसनच्या प्राचार्यांवर सडकून टीका केली आणि संपादकीय लिहिले 'हे आमचे गुरुच नव्हेत.’
१९०६ साली सेकंड एल. एल.बी साठी सावरकर मुंबईला आले. ते इथेही राजकारणात सक्रिय होतेच. मुंबईच्या गिरगांव भागात त्यांच्या सभा होत असत. मुंबईत त्यांचे एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण झाले. पण आता पुढे काय करायचे ? हा प्रश्न होताच. बॅरिस्टर व्हायचे तर लंडनला जाणे आवश्यक होते. पण इथे घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यात लंडनला जाण्याचा खर्च कुठून परवडणार ? पण सावरकरांनी शामजी कृष्ण वर्मा यांच्या ‘इंडियन सोशिऑलॉजिस्ट ’ या लंडन मधील संस्थेबद्दल ऐकले होते. श्यामजी कृष्ण वर्मा उच्च शिक्षणासाठी काही निवडक विद्यार्थ्याना शिष्यवृत्त्या देत असत. सावरकरांनी त्यासाठी अर्ज केला व त्यासाठी खुद्द लोकमान्य टिळकांनी सावरकरांसाठी शिफारस पत्र श्यामजी कृष्णवर्मा यांच्याकडे पाठवले होते. त्यामुळे ही दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती सावरकरांना मिळाली व परदेशी जाण्यासाठी म्हणून पहिले चारशे रुपयेही सावरकरांना टिळकांनीच दिले.
१९ जून १९०६ रोजी सावरकर ‘पर्शिया’ नावाच्या बोटीतून इंग्लंडला निघाले. पण एरवी इतका कणखर असणारा विनायक बोटीवर चढताना मात्र अगदी गहिवरून गेले होता. मोठा भाऊ, वहिनी, बायको आणि त्यांचा छोटा मुलगा यांच्या विरहाचा तो परिणाम होता. तेव्हाच्या काळी इंग्लंडला गेलेला माणूस साधारण तीन ते चार वर्षात परत येत असे. पण विनायकाला आपण परत येऊ शकू की नाही ? अशी भीती वाटत होती. कारण साधारणपणे सर्वजण इंग्लंडला जात ते उच्च शिक्षण घेऊन एक तर सरकारी नोकरी करण्यासाठी किंवा तिथेच स्थायिक होण्यासाठी. पण तेवीस वर्षाच्या या विनायकाचा मनसुबे काही वेगळाच होता. लंडनला शत्रूच्या शिबिरात शिरून क्रांतिकारी कारवाया करण्याचा मनसुबा,बॅरिस्टर हे तर फक्त एक निमित्त होते. लंडनमध्ये राहून इंग्रजांविरुद्ध लढा म्हणजे मृत्युशी झुंज देण्यासारखे होते. त्यामुळे परत येणे कितपत शक्य होईल याबद्दल विनायक जरा साशंकच होता.
सावरकर प्रथमच आपली मातृभूमी सोडून कुठल्यातरी दुसऱ्या देशात जाण्यासाठी निघाले होते.तिकडचे रीति-रिवाज राहण्या-बोलण्याच्या पद्धती सारे काही नवीन होते. अगदी भारतीय पोशाख म्हणजे धोतर-सदरा वगैरे घालून सावरकर बोटीवर चढले. तिथे त्यांना सर्वच नवीन होते. आजूबाजूचे सर्व चेहरेही अनोळखीच. पण मुळात सावरकरांचे व्यक्तिमत्वच इतके आकर्षक होते की ते कोणावरही छाप पडून जाईल. त्यामुळे काहीच काळात बोटीवरही त्यांच्या ओळखी झाल्या तश्या गप्पा रंगू लागल्या. इथेच सावरकरांची हरनामसिंग ज्याला आपण मदनलाल धिंग्रा म्हणून ओळखतो आणि इतर मंडळींची ओळख झाली. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वामुळे सारे आधीच भारावून गेले होते. त्यामुळे लंडन येईपर्यंत त्यांनी सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या गुप्त क्रांतिकारी संघटनेच्या प्रतिज्ञाही घेतल्या होत्या.
‘पर्शिया’ बोट एडनवरून सुएझ कालव्यातून भूमध्य समुद्रातून फ्रान्सच्या मार्सेलिस येथे आली. मार्सेलिस म्हणजे क्रांतिकारकांची काशीच. इथेच आपल्या उमेदीच्या काळात मॅझिनीने इटलीच्या स्वातंत्र्यासाठीच्या क्रांतिकारी कारवाया केल्या होत्या. सावरकरांच्या पुढील आयुष्यमध्ये ‘मार्सेलिस’ हे नाव कायमचे लक्षात राहणार होते. पुढे मार्सेलिसमध्ये आपल्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाचा प्रसंग घडणार आहे याची सावरकरांनी कधी कल्पनाही केली नसेल. कारण त्यासाठी अजून चार वर्षे जावी लागणार होती. लंडनला जाणारे लोक मार्सेलिस वरून रेल्वेने पुढे लंडनला जाणार होते. त्यासाठी सावरकरांनी ‘पर्शिया’ सोडले आणि ३ जुलै १९०६ साली लंडन मध्ये दाखल झाले.
इकडे सावरकरांनी ज्या दिवशी मुंबई सोडली. तेथून पाचच दिवसांनी मुंबई सरकारच्या पुण्याच्या स्पेशल डिपार्टमेंटने ‘इंडिया ऑफिस’ ला पत्र लिहून कळवले की, ‘विनायक दामोदर सावरकरांवर नजर ठेवा.’
आता येथून पुढे इतिहासाला एक वेगळीच कलाटणी मिळणार होती. मुंबई सरकारच्या स्पेशल डिपार्टमेंटने ब्रिटिश सरकारला खबरदारी म्हणून कळवले होते. पण ‘इंडिया ऑफिस’ ला त्याची गंभीरता अजून समजली नव्हती. पण थोड्याच दिवसात हा त्यांचा गोड गैरसमज दूर होणार होता आणि लंडनला विनायक दामोदर सावरकर हे नाव चांगलेच परिचित होणार होते.
सावरकरांच्या लंडनमधील क्रांतिकारी कारवायांची कहाणी आपण पुढील लेखामध्ये पाहू.
- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी
खूप छान.पुढचा भाग वाचण्यास उत्सुक.
ReplyDeleteChhan lekhan👌👌😊
ReplyDeleteसुंदर लिखाण! आपले स्वातंत्रवीर तर हॅरी पाॅटरचे आजोबाच जणू!थरार लिखाणात जाणवतो.पुढच्या रविवारकडे डोळे लागलेत!
ReplyDeleteखूप छान अपूर्व तुझ्या मराठी शब्द संग्रहाचे कौतुक करावे ते कमीच. पुढच्या भागाची वाट पाहतेय
ReplyDelete