सावरकर एक विचारधारा : भाग २


ज्याचा कर (हात )आपल्या पडत्या राष्ट्राला सावरतो तो ‘सावरकर’ आणि खऱ्या अर्थाने सावरकर हे नाव सार्थ करून दाखवणारे  एक व्यक्तिमत्व  म्हणजे विनायक दामोदर सावरकर. या व्यक्तीचे आयुष्य कोणत्याही गूढ आणि साहसी कथा कादंबरीपेक्षा वेगळे नाही. यातही पावला-पावलावर अनेक थक्क करणाऱ्या घटना आहेत. तर कधी डोळ्यातून अश्रू आणणारे प्रसंग आहेत. कधी साहस आहे. तर कधी अत्यंत प्रेरणा देउन जाणाऱ्या लहरी आहेत.  
                  वि.दा. सावरकर आणि  त्यांचे विचार समजावून घ्यावेत याचे महत्वाचे  कारण म्हणजे त्या विचारात असलेली स्पष्टता, उदात्तता आणि कमालीचे पांडित्य. पण आपल्या  सर्वांसमोरचा मूळचा प्रश्न हा की, या ऐतिहासिक पात्रांचा अथवा त्यांच्या विचारांचा अभ्यास आपण करावा तरी का? आणि त्याचा आत्ता वर्तमानकाळात आपल्याला उपयोग काय ? जे घडून गेले त्याचा हा उहापोह कशासाठी ? पण याचेही उत्तर आपल्याला सावरकरांच्या साहित्यात  सापडते.  मुळात ऐतिहासिक पात्रांचा अभ्यास हा निसर्गजन्य कृततज्ञतेसाठी करावा. त्यांनी जगावर जे उपकार केले आहेत त्याचे स्मरण म्हणून करावा. तरुणांना किंवा संपूर्ण समाजाला  प्रेरणा देणारे ते स्त्रोत आहेत म्हणून करावा. या इतिहासातून चांगले-वाईट, चूक-बरोबर हे सारे शिकूनच आपल्याला पुढे जायचे आहे. इतिहासाला डावलून जो समाज पुढे जातो तो अतिशय कमकुवत बनत जातो. म्हणून अश्या इतिहासातील थोर पात्रांचा अभ्यास करणे आपल्याला  गरजेचे आहे. 
   तर  प्रत्येक थोर माणसाची  किंवा विचारवंतांची  मोठे होण्याची बीजे त्याच्या लहानपणात कुठे तरी खोल वर रुतलेली असतात. काही विशेष प्रसंग त्यास कारणीभूत असतात. तरुणपणात ती बहरून येतात. त्यामुळे सावरकरांचे बालपण थोडक्यात का होईना पण माहिती असणे अपरिहार्य आहे. 
               विनायक सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ साली झाला तो नाशिक जिल्ह्यातील भगूर या छोट्याश्या गावी. याच भागात सावरकरांना पूर्वी इनाम मिळालेली पेशवे कालीन वतने होती. दामोदरपंत आणि यशोदाबाई यांना चार अपत्ये  गणेश (बाबाराव), विनायक (तात्याराव),  नारायण आणि  मुलगी माई. विनायक दीड-दोन  वर्षाचा असतानाच त्याचे  मातृछत्र हरवले. पुढे त्यांच्या वडिलांनी दामोदरपंतांनीच या चौघांचा सांभाळ केला. पण पुढे काही काळाने आलेल्या  प्लेगच्या  साथीमध्ये त्यांचे पितृछत्र ही हिरावले गेले. 
               लहानपणापासूनच विनायक अत्यंत प्रतिभावंत होता.  विनायकला कविता,राजकारण,तत्वज्ञान आणि इतिहास यांचे प्रचंड वेड. तोच थोरले बंधू  गणेशरावांना वेद व योगसूत्रे यांमध्ये रस. विनायकाला लहानपणापासूनच उस्फुर्त  कविता सुचत, बसल्या-बसल्या तो कित्येक कडव्यांच्या कविता रचत असे. त्याकाळी भारतीय राजकारणावर लोकमान्य टिळकांची जबरदस्त पकड होती. त्यांचे ‘केसरी’ मधील लेख अत्यंत गाजत असत.  तेव्हा वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी  टिळकांच्या, ‘स्वराज मागणाऱ्यांनी स्वदेशीचे व्रत घेतले पाहिजे.’ ह्या हाकेला सावरकरांनी एक स्वदेशी फटका  लिहिला :
                आर्यबंधु हो उठा उठा का मठासारखे नटा सदा
  हटा सोडुनि कटा करू या म्लेंच्छपटा ना धरू कदा 
काश्मीराच्या शाली त्यजुनी अलपाकाला का भुलता 
 मलमल त्यजुनी वलवल चित्ती हलहलके पट का वरिता

तसेच याच वयात त्यांनी ‘देवीविजय’ हा पुराणातील ग्रंथ वाचून त्यावर स्वतःच्या तीनशे-चारशे  ओव्या लिहिल्या. यावरून त्यांना उपजत  असलेली ही  दिव्य  प्रतिभा आपल्याला  जाणवते. 
            असाच एक किस्सा म्हणजे, एकदा सावरकर एका  वक्तृत्व स्पर्धेमध्ये  भाग घ्यायला गेले होते. तेथे त्यांच्या भाषण करण्याचा क्रमांक सगळ्यात शेवटी होता. त्यामुळे विनायक भाषण करायला उभारला तेव्हा सारे श्रोते कंटाळून गेले होते. पण जेव्हा विनायकने बोलायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांचा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला व सारे थक्क होउन ऐकू लागले. नंतर परीक्षक म्हणाले, ‘आत्ता  हा मुलगा जे काही बोलला  ते अत्यंत  उत्कृष्ट होते. पण तो जे बोलला ते विचार त्याचे नसावे. हे विचार त्याच्या वयाला झेपणारे व शोभणारे नाहीत.  ते त्याने कोणाकडून तरी लिहून घेतले असावेत.’
           हे ऐकून विनायक म्हणाला, ‘ हे माझेच विचार आहेत. मी ते कोणाही कडून लिहून घेतलेले नाहीत. मला सवय आहे ती  स्वतःचे विचार मांडण्याची. मी दुसऱ्यांचे विचार उसने घेत नाही.’ हे असे खरमरीत प्रत्त्युत्तर पाहून परीक्षकांना राग आला पण त्याबरोबरच  त्यांनी हेही मान्य केले की,  हे विचार स्वतः विनायकचेच आहेत. तसेच त्याला प्रथम पारितोषिकही दिले. पण त्यावर विनायक म्हणाला, ‘ज्यांना मी मांडलेले विचार माझेच आहेत हे समजले  नाही. त्यांच्याकडून मला कोणतेही बक्षीस नको.’ कोणत्याही परिस्थितीमध्ये  आपल्या स्वाभिमानाची कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याची हीच वृत्ती पुढे त्यांना अंदमानातही उपयोगी पडणार होती.  
           पण विनायकांमधला स्वातंत्र्यवीर उफाळून वर यायला कारण ठरला तो एक प्रसंग ज्याला आपण त्यांच्या आयुष्याचा एक triggering पॉईंट म्हणू शकतो तो म्हणजे, पुण्यात चापेकर बंधुंनी  २२ जून १८९७ रोजी जनतेचा छळ चालवलेल्या रँडची केलेली हत्या. या देशभक्त चापेकर बंधूंना इंग्रज सरकारने ‘माथेफिरू’ ठरविणे तसे स्वाभाविकच होते. पण आपल्याही काही लोकांनी त्यांची ही अशी अवहेलना करावी हे विनायकला सहन होत नव्हते. पण शेवटी १८ एप्रिल १८९८ रोजी चापेकरांना फासावर चढवण्यात आले. पण, ती रात मात्र विनायकने तळमळत तळमळत काढली. चापेकर बंधूंना फाशी होणे हे त्याला पटत नव्हते. त्या चापेकर बंधूंचे कार्य थांबता काम नये ते कोणीतरी पुढे चालू ठेवलेच पाहिजे हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. पण एका  क्षणाला त्याने विचार केला कि, कोणीतरी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे तर ते मीच का नाही ? ह्या देशकार्याच्या यज्ञामध्ये मीही का समिधा होउ नये ? त्या क्षणी तो देव घरातील देवी अष्टभुजेच्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसला आणि वयाच्या अवघ्या पंधराव्या  वर्षी प्रतिज्ञा केली, "यापुढे मी माझ्या देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्याकरता सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून, मारता मारता मरेतो झुंजेन. या युद्धात शत्रूला मारत मी चापेकरांसारखा नष्ट होऊन जाईन किंवा शिवाजीसारखा विजयी होऊन, माझ्या मातृभूमीच्या मस्तकावर स्वराज्याचा अभिषेक करीन." 
            ही  जी  ठिणगी  छोट्या विनायकाच्या अंतःकरणात पडली ती पुढे त्याच्या अखंड ज्वाला करत सुटली. याच आगीच्या ज्वालांनी पुढे मदनलाल धिंग्रा सारख्या कित्येक जणांनी पेट घेतला व सशस्त्र क्रांतीचा केतू उभारला.
            या केतूची पहिली सुरुवात १ जानेवारी १९०० साली नाशिकमध्ये ‘मित्रमेळा’ ही संस्था स्थापन करून सावरकरांनी केली. सुभाषचंद्रांच्या ‘फॉरवर्ड ब्लॉक’ सारख्याच सुरुवातीला लहान असणाऱ्या या ’मित्रमेळ्याने’ पुढे इंग्रज सरकारला हैराण करून सोडले होते. कारण, विनायक दामोदर सावरकर ही आत्ता फक्त एक व्यक्ती नसून तो एक विचार आणि सशस्त्र क्रांतीची ज्वाला बनण्यास सुरुवात झाली होती. 
            या पेटलेल्या ज्वालेची पुढील कहाणी वाचण्यासाठी नक्की वाचा पुढील आठवड्यातील लेख. 


- अपूर्व कुलकर्णी 

Comments

  1. खूप छान. पुढील भागासाठी आतुर आहे.

    ReplyDelete
  2. खुप छान लेख. आजच्या आत्मप्राैढीमध्ये रमणा-या समाजातील काही घटकांनातरी ह्या लेखामुळे आत्मपरिक्षणाची बुद्धि हाेईल ही अपेक्षा

    ReplyDelete
  3. अपूर्व खूप छान लिहिले आहेस.वाचताना तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो.पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक.

    ReplyDelete
  4. खूप सुंदर👌पुढील भागासाठी शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर : एक विचारधारा - भाग १

चापेकर बंधूंची अजरामर कहाणी - गोष्ट भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या राजकीय हत्येची