तेजोमय स्वतंत्रवीर सावरकर (Tejomay Swatantryveer Savarkar)
प्रखर तेज, वाऱ्याशी स्पर्धा करणारा बुद्धीचा वेग, खडकासारखी कठोरता आणि प्रत्यक्ष बृहस्पतीनही शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची
प्रगल्भता, ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करायची ते थोर पुरुष म्हणजेच स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर.
या
थोर देशभक्ताने आयुष्भर फक्त देशसेवाच केली. स्वताच घर अथवा संसार असा कधी केलाच
नाही. आपल्या जीवन हयातीत बारा हजार (१२,०००) पानांचं साहित्य लिहून ठेवलं. इंग्रजीतील
प्रत्येक शब्दाला मराठीत पर्यायी शब्द शोधला आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे वैभव
वाढवले आणि भाषा समृद्ध केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर देशकार्यासाठी इंग्लंडमध्ये शिकत असताना, पुस्तकातून
आपल्या क्रांतिवीरांना शस्त्र पाठवली. देशप्रेमासाठी भर समुद्रात उडी मारून सतत
चार दिवस पोहत राहिले आणि पोहताना मृत्यू समोर दिसत असताना देशावर कविता केली,‘ने
मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...’. स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः
ब्राम्हण असून मागास्वर्गीयांसाठी अनेक आंदोलने केली. रत्नागिरीत पतित पावन
मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले. आयुष्यात जवळ-जवळ ३०
वर्षाची काळ्यापाण्याची खडतर शिक्षा भोगली. शेवटपर्यंत देशहिताचाच विचार केला.
अश्या या कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या, स्वकर्माने देवत्व प्राप्त करून
घेणाऱ्या या थोर कर्मयोग्यास काही करंटे लोक ‘नकली’ म्हणतात म्हणजे केवढे हे
दुर्भाग्य. या थोरास ‘नकली’ म्हणणारे लोक किती असली हा तर वेगळा प्रश्नच आहे. पण, सावरकराना ‘नकली’ म्हणून सावरकरांची
उंची कमी नाही झाली तर म्हणणाऱ्यांनी मात्र आपली पातळी दाखवली एवढ मात्र खर. येथे
सावरकरांच्या काही मतांबद्दल नक्कीच काही मतभेद असू शकतील, सर्वांनाच त्यांची
सर्वच मते पटतील असे नव्हे पण म्हणून त्यांच्या देशभक्ती बाबत संशय कसा घेता येईल?
सावरकरांवर काहीही बोलण्यापूर्वी अगोदर समग्र सावरकर समजून घ्यायला हवेत, अंदमानात
त्यांनी मातृभूमी साठी सोसलेल्या यातना पहायला हव्यात आणि मग आपले मत व्यक्त
करायला पाहिजे. माझी खात्री आहे कि सावरकर समजले कि आपले हात नक्कीच फक्त
नमनासाठीच जुळतील.
काही
लोक म्हणतात कि, ‘सावरकरांनी ६ वेळेला इंग्रजांकडे
दयेची भीक मागितली’. हो! पण, ती क्षमा सावरकरांनी का मागितली हे समजण्याइतपत
त्याच्याकडे बुद्धीचातुर्य नाही हेच त्यांचे दुर्दैव. त्या क्षमे मागचा छुपा गनिमी
कावा आपण समजणे मह्त्वाचे आहे. तुरुंगामध्ये आयुष्याचे महत्वाची वर्षे म्हणजे
तब्बल ५० वर्षे वाया घालवण्यापेक्षा माफी मागून बाहेर येऊन पुन्हा देशकार्य करायचे
हा हेतू त्या माफीनाम्यामध्ये होता, कारण अकारण अहंकार दाखवून ५० वर्षे वाया
घालवण्याची गरज नव्हती. ज्याप्रमाणे महापुरामध्ये ताठ राहणारी मोठ-मोठी झाडे
उन्मळून पडतात,पण छोटी छोटी लव्हाळी वाचतात. छत्रपती शिवाजी महाराजही वेळ प्रसंग
पाहून कधी-कधी माघार घ्यायचे व नंतर पुन्हा
लढाई करून पुन्हा जिंकायचे. याला भ्याड नाही तर समयसुचकता म्हणतात आणि ही एक युद्ध
नीतीच आहे.
तसेच, स्वतंत्र्यवीर सावरकरांना ‘नकली’ म्हणणाऱ्या लोकांनी आधी स्वतःची
पात्रता तपासावी. कारण, सावरकरांसारखं भर समुद्रात देशप्रेमा पोटी उडी घेण हे स्विमिंगपूल
मध्ये उडी घेण्याइतक सोप्प नाही. त्यासाठी प्रखर देशप्रेमच लागते. सावरकरासारखं
१२,००० पानांचं साहित्य लिहिण म्हणजे कुणीतरी लिहून दिलेलं भाषण नुसत वाचून
दाखवण्याइतक सोप्प नाही. त्यांच्या सारखं मागासवर्गीयांसाठी लढण म्हणजे
निवडणुकांच्या तोंडावर मतांसाठी लाचार होण्याइतक सोप्प नाही. परदेशातून आपल्या
क्रांतीकारकांना मदत करणे ,हे काही देशाविरोधात घोषणा देणाऱ्याचे मतांसाठी समर्थन
करण्याइतके सोप्पे वाटले का या करंट्याना?
तसेच,काही लोक हे सावरकरांच्या ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेचा ही त्यांच्या
संकुचित वृत्तीमुळे तिरस्कार करतात. पण,या अश्या थोर माणसांची वृत्ती इतकी संकुचित
असेल का? सावरकरांच्या मते हिंदू म्हणजे, ‘एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीने
आणि प्रेमाने वागण म्हणजे हिंदू होय’. पण,आज आपण ‘हिंदू’ ही उद्दात संकल्पना एका
ठराविक समाजापुती संकुचित केली आहे. स्वामी
विवेकानंदांनी सुद्धा भगवी कफनी आणि फेटा बांधून शिकागो मध्ये हिंदू
धर्माचे प्रतिनिधीत्व केल म्हणून तुम्ही त्यांना फक्त हिंदू धर्माचेच समजणार का?
तर, नाही. कारण या थोरांच्या ‘हिंदू’ या शब्दाच्या संकल्पनाच खूप उद्दात्त होत्या.
त्यामुळे सावरकरांसारख्या थोर नेत्यास, जो आयुष्याची ८३ वर्षे केवळ आणि
केवळ देशहिताचाच विचार करत राहिला. सतत देशाचा विकास चिंतीला त्या थोर देशभक्तास
कोणीतरी येतो आणि ‘नकली’ म्हणून संबोधतो याची चीड न येण्याइतके आपण षंढ आहोत का?
पण, लोक या थोर देशप्रेमी नेत्यास अभ्यासाभावी त्याच्याबद्दल चुकीचे बोलून
त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. याचेच तेवढ दुखं आहे.
पण,सावरकर हे अजरामरच आहेत. त्यांची महती अगाध आहे. त्यासाठी कुणाच्या
पावतीची गरज नाही. कारण, सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर, ती थुंकी आपल्याच
तोंडावर पडते सूर्य तसाच तेजाने चमकत असतो.
शेवटी
मी स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकरांच्या चरणी वंदन करतो.
धन्यवाद
अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी
१२ वी (विज्ञान)
खारघर,नवी मुंबई.
Please Log on to-
Ø apoorvkulkarni1999.blogspot.in
Ø youtube.com/apoorvkulkarni1999
Comments
Post a Comment