‘ईश्वर नाकारण्याचा अट्टाहास का?’

        
               Play In Audio    

             अलीकडील एक लेखक हे ईश्वराच्या अस्तित्वा विषयी भूमिका मांडत आहेत. त्यांचे लेख वाचल्यानंतर अश्या प्रकारच्या नकारत्मक लिखाणाचा प्रतिवाद करावा वाटला म्हणून हा लेखन प्रपंच केला. सदर लेखामधून लेखक यांनी ईश्वर अथवा त्यचे अस्तित्व नाकारण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. परंतु ईश्वर आहे कि नाही? ईश्वराच्या अस्तित्वाची सत्यता काय? हे प्रश्न अगदीच निरर्थक वाटतात. कारण,ईश्वर हा सिद्धांत मांडण्याचा नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. ‘निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा’ या लेखात लेखक महाशय स्वतः म्हणतात की, ‘ईश्वर नाही हे गणितासारखे सिद्ध करता येत नाही’ म्हणजेच त्याला अनुभवून सिद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विज्ञान ही अनुभवाला महत्व देतेच .कारण,नुसताच सिद्धांत मांडून उपयोग नसतो तर त्याचा अनुभवही यायला लागतो. न्यूटनने मांडलेला सिद्धांत लोक अनुभवत होते, म्हणूनच तो सर्व मान्य झाला. तसेच,लेखक महाशय असेही म्हणतात की, ‘धर्मामुळे खूप दंगली,कत्तली झाल्या,अनेकांना आपले प्राण गमवावे लागले व हे सर्व धर्मश्रद्धांचे परिणाम आहेत. तसेच,दुसऱ्या धर्मियांवर प्रेम करा,त्यांना बंधू भावाने वागवा असे सर्व धर्म शिकवतात का?.’हे त्यांचे वाक्य अतिशय निरर्थक आहे. कारण,सर्व धर्म ग्रंथ समता व बंधूभावच शिकवतात आणि जर दंगली आणि कत्तल यांचा प्रश्न असेल तर तो धर्मामुळे काय पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानही मानवाला शांतता देऊ शकले नाही. म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान निरर्थक म्हणायाचे का? लेखक महाशयआपल्या ‘म्हातारी पृथ्वी व पोरांची लेंढारे’ या लेखात म्हणतात, ‘अगदी अब्जावधी माणसे या पृथ्वीवर शांत व सुखी जीवन जगू शकतील अशी परिस्थिती,विज्ञानाने मुख्यत्वे अवघ्या दोनचारशे वर्षात निर्माण केली.’ हे वाक्य किती सत्यता दर्शवते. आजचेच उदाहरण द्यायचे तर आज मोठ्या प्रमाणावर computer,mobile,इंटरनेट यांचा गैर वापर होतो. म्हणून,काय आपण त्यांचे जे निर्माते आहेत त्यांना वाईट ठरवू  शकत नाही. या गोष्टींचा चांगला वापर करून उन्नती करणारे आहेतच की, किंबहुना तेच जास्त आहे. अगदी धर्माचेही तसेच आहे. सर्व धर्म प्रेम,बंधुभावाच शिकवतात. ते जर काही लोकांना जमले नसेल तर त्यात धर्म वाईट ठरत नाही. कारण,किती चांगले संस्कार केले तरी काही मुले बिघडतातच त्याचा दोष पालकांना देता येत नाही. जर,धर्माच्याच नावाखाली दंगली,कत्तली झाल्या असे लेखकांचे  म्हणणे असेल तर,ते नक्कीच एककल्लीविचारांचे आहेत. कारण, आजकालच्या तंत्रज्ञानामुळे पसरलेली अशांतता त्यांना दिसत नाही अथवा दिसली तरी मान्य नाही करायची. त्यामुळे मानवता आणि धर्म हे वेगळे न करता येणाऱ्या मिश्रणासारखे आहेत.त्यांना वेगळे करणे शक्य नाही.

            तसेच लेखक महाशय म्हणतात की, ‘मानवतावाद हा आत्मा वगैरे संकल्पना मानत नाही. तत्कालीन विचारवंतांना, प्रेषितांना,ऋषीमुनींना व नंतरच्या काळातील संतश्रेष्ठांनासुद्धा विसाव्या शतकातील ज्ञान उपलब्ध नव्हते.म्हणून,त्यांनी ईश्वर कल्पिला असावा.’ हे वाक्य अतिशय अहंकाराचे वाटते.कारण,मग एखादा माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते? कारण वैद्यकीय शास्त्राला दिसणारा एकही अवयव नाहीसा होत नाही. मग काही जात नाही तर माणूस का मरतो? तेव्हा त्या शरीरातून आत्माच जातो. आत्मा ही काही सिनेमात दाखवतात तशी पांढरी आकृती नसून आत्मा म्हणजे एक शक्ती(energy) आहे आणि विज्ञानानुसार ‘Energy neither be created nor destroyed आहे. तेच गीतेमध्ये म्हटले आहे, ‘नैनंम छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक,न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयिति मारुतः’.त्यामुळे आत्मा(energy) ही संकल्पना खरी आहे. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म हे दिसताना जरी दोन टोके दिसली तरी मूलतः एकच आहेत. लेखक महाशय त्यांच्या ‘ईश्वर नाही हेच सत्य’ ह्या लेखात अणु-रेणू च्या प्रचंड शक्ती बद्दल सांगतात. अणुचा शोध हा १८व्या शतकात लागला. पण,संत तुकारामांनी १६व्या शतकात एका अभंगात म्हटले आहे की, ‘अणु रणीया थोकडा....’.तसेच,१७व्या शतकात ग्यलिलिओने पृथ्वी गोल आहे हे सांगितल्यावर लोकांनी त्याला वेड्यात काढले होते.पण, समर्थ रामदास स्वामी १६व्या शतकात ‘दासबोधात’ पृथ्वी गोल आहे हे अनेक वार सांगतात. तसेच न्यूटनचा ३रा सिद्धांत सांगतो, ‘Every action there is a equal and opposite reaction’ तेच आपले संत अध्यात्मिक भाषेत सांगतात, ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतसे ईश्वर’.तसेच संत म्हणतात, ‘जे पिंडी तेच ब्रम्हांडी’ म्हणजेच जी आपल्या सूर्यमालेची रचना आहे तीच आपले शरीर ज्या अणु-रेणूनंनी बनले आहे त्याची आहे.

             त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म्य यांच्यातील फरक शोधण्याचे व्यर्थ प्रयत्न करण्यापेक्षा त्यातील साम्य शोधावे व समन्वय कसा साधावा हे पाहण्यात जास्त यश आहे. पण,या बाबतीत लेखकांचे लेखन हे नक्कीच एककल्ली व हट्टी आहे. शरद बेदेकारांसारख्या आपलेच म्हणणे पुढे रेटणाऱ्यामुळे समाजात चुकीचे संदेश जाऊन नवीन पिढ्यांसमोर गोंधळाचे वातावरण निर्माण होते व आध्यात्मिक तत्त्वज्ञानाकडे दुर्लक्ष होते.

             आमचे एक कुटुंब मित्र जे स्वत: अध्यात्माचे गाढे अभ्यासक आहेत ते म्हणतात कि लेखक महाशयांनी  लहानपणी औस्तुक्याने काही नामजप वगैरे केला असावा असे दिसते. पण चिकाटी, ईश्वरी अधिष्ठान वा संत कृपा नसल्याने अनुभूति आलेली नाही. नामसंकीर्तनास केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्वच संत महत्त्व देतात कारण त्यांना आलेली प्रचिती!!  या ग्रहमालेपलिकडे विश्व आहे हे आधी असत्यच वाटत असे आणि आता ते प्रत्ययास येत आहे. त्यामुळे कोणतीही विधाने करताना अथवा एखादा सिद्धांत मांडताना प्रचंड अभ्यास , निरक्षण व अनुभव तथा अनुभूती असणे अत्यंत आवश्यक आहे. लेखक महाशयांपेक्षा दशसहस्रपटीने विद्वान व तार्किक असलेल्या नरेन्द्रनाथांचे श्रीरामकृष्ण परमहंसांच्या कृपेने स्वामी विवेकानंद झाले पण ते भाग्य लेखक महाशयांच्या कपाळी नाही.”

               पण आपण मनुष्य या सर्वाचा करता आहे असे म्हणत असू तर कुठलीही गोष्ट मनुष्याच्या म्हणण्याप्रमाणे झाली पाहिजे.पण उलट आपण बरेच प्रयत्न करुन ही काही गोष्टी साध्य होत नाहीत याचाच अर्थ करणारा कुणीतरी  वेगळा आहे आणि तो म्हणजेच परमेश्वर.जशी हवा दिसत नाही पण जाणवते व oxygen चा पुरवठा करुन आपणास तारते.अगदी त्याच प्रमाणे परमेश्वर दिसत नाही पण आपल्या कृपने तारतो.पण,अधात्माच्या नावाखाली जर कोणी फक्त सरस्वतीची पूजा करून किंवा लक्ष्मीची पूजा करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करील तर तो केवळ मूर्खपणा. कारण,सरस्वतीची पूजा म्हणजेच अभ्यास तर लक्ष्मीची पूजा म्हणजे प्रामाणिक कष्ट होत. हे करण्याचे मनोधैर्य ,शक्ती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी पूजा हा एक प्रकार होय.पण,अध्यात्म नावाखालील अंध श्रद्धांचा विरोध होणे मात्र गरजेचे.त्या अंधश्रद्धेला मानवतावाद काय पण धर्मही पाठीशी घालत नाही. धर्म हा नेहमीच कर्मयोग सांगणारा आहे.तेव्हा लेखकांनी ‘ईश्वर नाही हेच सत्य’ असे पाया नसलेले सिद्धांत मांडता अंधश्रद्धानिर्मुल कसे होईल हे पाहावे नव्हे तर समाजाला आज त्याचीच गरज आहे.

                      
  
                     धन्यवाद          

                                -अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी

                                 इयत्ता १२वी(विज्ञान)

                                 खारघर,नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

सावरकर : एक विचारधारा - भाग १

चापेकर बंधूंची अजरामर कहाणी - गोष्ट भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या राजकीय हत्येची

सावरकर एक विचारधारा : भाग २