चापेकर बंधूंची अजरामर कहाणी - गोष्ट भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या राजकीय हत्येची
(माझा सदर लेख हा 'तरुण भारत' या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.)
आज २२ जून भारतीय स्वतंत्र लढ्यात या दिवसाला एक विशेष महत्व आहे. याचे कारण म्हणजे बरोबर १२३ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी थेम्स नदीच्या काठी थरकाप उडाला होता व संपूर्ण लंडन हादरले होते. कारण होता पुण्यात मुठेतीरी घडलेला प्रसंग. चापेकर बंधूंनी गणेशखिंडीमध्ये वॉल्टर रॅंड या ब्रिटिश अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. पण हा फक्त एक साधारण खून असता तर त्याला इतके महत्व प्राप्त झाले नसते. पण ती होती भारतीय इतिहासातील पहिली राजकीय हत्या. या आधी कोणत्याच ब्रिटिश अधिकाऱ्यावर असा हल्ला करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. यामध्ये कोणतेही व कोणाचाही वैयक्तिक हेतू नसून, प्रचंड जनक्षोभाचा तो एक गंभीर परिणाम होता.
आपण विचार करत असाल की एका हत्येचे एवढे काय ते महत्व ? स्वातंत्र्य लढ्याच्या काळात असे अजूनही प्रसंग घडलेच की, पण ही हत्या फक्त एक घटना नव्हती तर ती एका नव्या सशस्त्र क्रांतीची सुरुवात होती. त्या क्रांतीमध्ये चापेकर बंधूंनी ही जी क्रांतीची आग पेटवली होती ती पुढे कित्येकांना प्रेरणा देत गेली. पण मुळातले प्रश्न हे की, त्यांनी ही हत्या का केली ? ती खरेच करणे गरजेचे होते का ? हत्या केली ती कशी व कुठे केली ? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या समोर असतील.
तर त्याचे आहे असे की, मुळात चापेकर यांचे घराणे हे काही हत्या, खून वगैरे करणारे किंवा त्यामध्ये सराईत असणाऱ्यांपैकी नव्हे. चापेकर घराणे हे मूळचे चिंचवड या गावचे कीर्तनकार. हरिभाऊ चापेकर कीर्तन करण्याच्या उद्देशाने पुणे येथे स्थायिक झाले. हरिभाऊ चापेकर यांना तीन अपत्ये दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिघेही त्यांच्याबरोबर कीर्तनच करत असत. मुळात या घराण्याची स्वभावतः वृत्ती अध्यात्मिक.
पण दिवसागणिक बदलणार्या परिस्थितीमुळे आणि टिळकांमुळे झालेल्या पुण्याच्या विचारातील बदलाने, रोज हजार-बाराशे सूर्यनमस्कार घालून बनलेल्या काटक व पीळदार शरीराने तरुण वयात लष्करी शिक्षण घेण्याची आवड निर्माण झाली. पण तीही आवड निर्माण होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे पुढे-मागे कधीतरी आपल्याला स्वातंत्र्यासाठी एखादी गुप्त संघटना स्थापन करता यावी म्हणून. नंतर काही काळाने चापेकर बंधूंनी ‘आर्यधर्म प्रतिबंध निवारक मंडळी’ नावाची संस्था स्थापन केली या संस्थेमार्फत तरुणांना सैनिकी प्रशिक्षण देत असत.
१८९६ साली मुंबई आणि पुण्यात प्लेगची प्रचंड साथ आली आणि इथे मात्र इंग्रज सरकारने अत्याचाराच्या सार्या मर्यादा पार केल्या. प्लेग साथीचे निवारण करायचे व प्रतिबंध करायचा या नावाखाली ब्रिटिश सरकारने स्थानिक लोकांचा अत्यंत छळ मांडला. स्त्री-पुरुष यांच्या सार्या मर्यादा पार करत लोकांच्या घरात घुसून ते अनागोंदी माजवत होते आणि या सगळ्याला जबाबदार होता तो म्हणजे पुण्याचा कलेक्टर म्हणून ज्याची खास नेमणूक झाली होती तो वॉल्टर रॅंड. त्याने आपल्याबरोबर कर्नल फिलिप्स आणि कॅप्टन बीव्हीरीज हे दोन लष्करी अधिकारी घेऊन संपूर्ण पुण्यात दडपशाहीची सत्र आरंभले होते. या साऱ्या परिस्थितीमुळे लोक अगदी त्रासून गेले होते.
१२ जून १८९७ रोजी पुण्यात एका कार्यक्रमात चापेकर बंधूंनी लोकमान्य टिळकांच्या समोर एक श्लोक सादर केला. त्यात त्यांनी अकार्यक्षम लोकांचा ‘षंढ’ म्हणून उच्चार केला होता. त्यावर टिळक त्यांना म्हणाले, ‘आज अकार्यक्षम लोकांना तुम्ही षंढ म्हणता, पण तुम्ही श्लोक म्हणणारे तरी दुसरे काय करता ? त्यांच्यापाशी काही पौरूष असते तर एव्हाना रँड जिवंत राहिला नसता.’ हा अभिप्राय दुसरा तिसरा कोणी साधीसुधी व्यक्ती उच्चारत नसून खुद्द लोकमान्य टिळक उद्गारात होते. त्यामुळे ते शब्द चापेकर बंधूंच्या मनाला फारच लागले आणि त्यांनी त्या क्षणीच ठरवले या अन्यायी रँड ला आता संपवायचे. आता या समस्त चापेकर बंधूंचा डोक्यात एकच विचार घोळत होता. या रँडला कसे आणि कुठे मारायचे ? पण हे काम तसे जोखमीचे व जिकरीचे . सावधानता व कमालीची पूर्वतयारी करणे जरुरीचे होते. नाहीतर नशिबी नुसताच तुरुंगवास आला असता व साध्य काहीच झाले नसते.
२२ जून १८९७ म्हणजे ब्रिटिश साम्राज्यरोहणाचा हीरक महोत्सव. या निमित्ताने मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांनी गणेशखिंडीतील आपल्या बंगल्यावर मेजवानीचे आयोजन केले होते. बस्स ! चाफेकर बंधूंनी हाच दिवस निश्चित केला. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी महादेव रानडे आणि विनायक आपटे हेही या कटात सामील झाले. तसेही चापेकर बंधूंचे रँड वर हल्ला करण्याचे दोन बेत आधीच फसले होते. त्यामुळे या वेळी कोणतीही चूक होणे परवडणारे नव्हते. म्हणून २२ जून ला सकाळपासूनच वासुदेव रँडच्या मागावर होता. दिवसभर रँड कौन्सिल हॉल, चर्च, वेस्टन इंडिया क्लब, मेजवानीचे ठिकाण जिथे-जिथे जाई तिथे-तिथे वासुदेव त्याच्यावर पाळत ठेवून होता .
रात्री उशिरा शाही मेजवानी संपली रँड आपल्या घोडा-गाडी मध्ये बसून घरी निघाला. अगोदर पासूनच दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर गणेशखिंडीतील जंगलात दबा धरून बसले होते. परवलीचा शब्द ठरला होता, ‘गोंद्या आला रे’. जशी-जशी रँडची गाडी जवळ आली तसा-तसा गणेशखिंडीत आवाज घुमू लागला ‘गोंद्या आला रे’. बाळकृष्ण चापेकरांनी लगोलग पळत जाऊन घोडागाडीच्या मागील बाजूने चढून बसलेल्या इंग्रजाला गोळी घातली. तो मनुष्य त्याच्या बायकोच्या मांडीवर लागलीच कोसळला. पण रँड तर गाडीमध्ये एकटा होता. मग हा नक्की आहे तरी कोण ? बाळकृष्णाने मारले तरी कोणाला ?
तर तो होता आयर्स्ट नावाचा लष्करी अधिकारी जो त्या मेजवानीमधून निघायला उशीर होऊ नये. म्हणून गडबडीने त्याच्या मित्राची गाडी घेऊन निघाला होता आणि ती घोडा-गाडी अगदी रँडच्या घोडा-गाडी सारखी दिसत होती. आयर्स्ट तर पडला. पण आता पुढे काय करायचं काय ? हा तिसरा प्रयत्नही फसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण इतक्यात परत ‘गोंद्या आला रे’ चा आवाज घुमू लागला. तोच दामोदर चापेकर धावत येणाऱ्या गाडीच्या मागून उजव्या खिडकीपाशी चढले आणि त्यांनी गोळी झाडली ती थेट रँडच्या फुफुसात घुसली. ३ जुलै १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या मुठा नदीकाठच्या प्रसंगाचे पडसाद थेट थेम्स नदीच्या काठाला जाऊन उमटले. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ मध्ये प्रचंड गोंधळ उडाला. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार गेल्या कित्येक वर्षात घाबरले नाही ते या एका घटनेने पुरते घाबरून गेले.
रँड आणि आयर्स्ट यांच्या खुनाच्या तपासासाठी हार्डली केनेडी व हॅरी ब्रुईन हे मोठे पोलीस अधिकारी पुण्यात दाखल झाले. खुन्याला पकडून देणाऱ्यासाठी सरकारने तब्बल २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पुण्यातील बंदोबस्तात वाढ करायची म्हणून खास १५ हजार पोलीस पुण्यात पाठवण्यात आले व त्यांच्या दीड लाख रुपयांच्या खर्चासाठी पुण्यातील लोकांवर जास्तीचा कर लावण्यात आला. यावरच टिळकांनी ६ जुलैला ‘या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?’ आणि नंतर ‘सत्ता करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे.’ हे अजरामर अग्रलेख लिहिले. ब्रिटिश सरकारला टिळकांना अटक करायला कारणच हवे होते. त्यांना हे कारण मिळाले आणि २८ जुलैला मुंबईत लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आले.
पण खंत वाटण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक घरभेदी असतो. आपल्याच मातीशी गद्दारी करणार असतो. तसाच तो इथेही होताच. लहानपणापासून चापेकर बंधूंना ओळखणारे व आधीच खोटी कागदपत्रे बनवण्याच्या अपराधात तुरुंगात असलेल्या द्रविड बंधूंनी २० हजार रुपयांच्या बक्षिसासाठी चापेकरांच्या विरोधात साक्ष दिली. मुळातच आपल्यामुळे लोकमान्य टिळकांना अटक झाली, हे कळाल्यामुळे आधीच दामोदर चापेकर खचलेले, त्यात द्रविड बंधूंनी केलेला हा घात. त्यामुळे दामोदर चापेकर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. खुनाची कबुली दिली, त्यांच्यावर रितसर खटला भरण्यात आला. न्यायाधीश क्रो यांनी ३ फेब्रुवारी १८९८ रोजी जाहीर केले,‘भारतीय दंडविधान कलम 302 खाली दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे.’ त्यावर चित्ताची शांतता ढळू न देता भर न्यायालयात दामोदर चापेकर म्हणाले, ‘महाशय आणखी काही शिक्षा आहे काय ?’
दामोदर यांना येरवड्याच्या तुरुंगात हलवण्यात आले. तेथेच लोकमान्य टिळकही असल्याने एकदा परवानगी काढून त्यांची तब्बल तीन तास भेट झाली. त्या वेळी दामोदर यांनी टिळकांकडून त्यांची गीतेची प्रत मागून घेतली. अखेर १८ एप्रिल १८९८ रोजी सकाळी साडेसहा वाजता हातात गीतेची प्रत व मनात भारतमाता घेऊन हा हुतात्मा अनंतात विलीन झाला.
पण वासुदेव चाफेकर यांना द्रविड बंधूंनी केलेला धोका सहन झाला नव्हता. तेव्हा वासुदेव चापेकर व महादेव रानडे यांनी दोन्ही द्रविड बंधूंची हत्या केली व आपल्या भावाविरुद्ध साक्ष दिल्याचा सूड घेतला व पुढे १८९९ च्या मे महिन्यामध्ये बाळकृष्ण चापेकर, वासुदेव चाफेकर व महादेव रानडे हेही फासावर चढले.
एकाच घरातील तीनही बंधूंनी असे देशासाठी, स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेले बहुधा हे एकमेव उदाहरण असावे. ब्रिटिश सरकारला वाटले होते चापेकर बंधूंना फाशी दिली म्हणजे सर्व काही शांत होईल. पण चाफेकर बंधूंनी पेटवलेल्या या आगीची तिकडे भगूर मधल्या एका १४-१५ वर्षाच्या मुलांमध्ये ही ठिणगी पडली होती. भगूर मध्ये हा लहान विनायक दामोदर सावरकर शपथ घेत होता,
'कार्य सोडुनी अपुरे पडला झुंजत, खंती नको पुढे
कार्या चालवु गिरवुनि तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे.'
- अपूर्व कुलकर्णी
अप्रतिम आणि रोमांचक लिखाण👌👌keep it up
ReplyDeleteअपूर्व, खूपच छान लेख.
ReplyDeleteवाचताना अंगावर शहारे आले.
चापेकर बंधुंना शतशः नमन.
व्वा अपूर्व!...चापेकरबधुंच्या शौर्याला व देशप्रेमाला ऊजाळा दिल्याबद्दल तुझं अपूर्व कौतुक आणी हार्दिक अभिनंदन!स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास असाच सोपा करुन नविन पिढी समोर ठेव!तरुण रक्तात ही उर्जा संचारणं ही आजच्या घडीची देशाची गरज आहे.Best Wishes always!
ReplyDeleteछान, इतिहासात पोहोचवल!
ReplyDeleteअपूर्व मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹💐💐अप्रतिम लेखन
ReplyDelete